मुख्य सामग्रीवर वगळा

शिवरायांचा वारसा

Santosh Mane SM News Arag:  
शिवरायांचा वारसा (खास दिपावलीच्या निमित्ताने)         
              नदीचा उगमस्थान कुणी कुणी पाहिलाय. केवढा असतो हो नदीचा उगमस्थान. अगदी छोटासाच झरा असतो. हो ना? पण नदी किती मोठी असते. खूप मोठी असते ना! मग नदीचा उगम इतका छोटा आणि नदी एवढी मोठी! कसं काय बरं शक्य आहे? नदी मोठी असण्याचं एकच कारण आहे. कारण नदी स्वतःमध्ये अनेक झरे मिसळून घेते. अनेक छोटे-मोठे झरे मिसळून घेत-घेत नदी दिसेल त्या मार्गाने पुढे-पुढे जातच असते. मग त्या वाटेवर कुणी आडवं आलं तर ती त्यालाही सोबत घेते. जर सोबत नाही घेता आलं तर त्याच्या नादाला न लागता आपला मार्ग बदलते, माञ ध्येय नाही बदलत. अनेक अडचणींना सामोरे जात नदी शेवटी समुद्रामध्ये सामावते.
        तसंच आपल्या मनातील विचारांचं आहे. आपल्या मनात शेकडो विचार घोळत असतात. काही चांगले तर काही वाईट. त्यातीलच एखादा चांगला विचार समाजामध्ये बदल घडवणारा असतो. त्या एका चांगल्या विचाराला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली कि त्या विचाराचे एका चांगल्या संकल्पनेत रूपांतर होते आणि त्या संकल्पनेला कल्पकतेची जोड मिळाली कि त्याचा समाजहितासाठी वापर करता येतो. उदाहरणच पाहायचं झाल्यास शिवरायांनी निर्माण केलेलं रयतेचं स्वराज्य बघा.

स्वराज्याची संकल्पना
        शहाजीराजांच्या मनात एक विचार आला कि, आदीलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही यांच्या जाचातून जर रयतेला मुक्त करायचं असेल तर रयतेचं स्वराज्य निर्माण व्हायला हवं. त्यांनी तो विचार जिजाऊंना सांगितला आणि स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने छञपती शहाजीराजे व राजमाता जिजाऊ हेच स्वराज्य संकल्पक आहेत. त्यांनी हीच संकल्पना बालशिवबांच्या मनात रूजवली. त्यांच्यावर लहानपणापासूनच अशाप्रकारचे संस्कार केले. माॅसाहेब जिजाऊंनी शिवरायांना अनेक भाषांमध्ये पारंगत केले. शिवाजीराजांना आठ भाषा येत होत्या. जिजाऊंनी शिवबाला गोरगरीब रयतेचं दुःखाचं कारण सांगितलं. रयत दुःखी आहे, यवनांच्या वारंवार होणाऱ्या  हल्ल्यांना ञासली आहे. या रयतेला यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण करून द्यावं, जिथं प्रत्येकाला समान वागणूक असेल, असं राज्य निर्माण व्हायला हवं असं बालशिवबांना वाटू लागलं. मग त्यांनी हा विचार, ही संकल्पना आपल्या बालसवंगड्यांना सांगितली. बघता बघता एक-एक माणूस स्वराज्याशी जोडला जाऊ लागला आणि स्वराज्यासाठी रक्त सांडायलाही मागे-पुढे न पाहणारी मावळ्यांची एक मोठी फौजच तयार झाली. स्वराज्यासाठी, शिवाजीराजांसाठी प्राण न्योच्छावर करणारे मावळे तयार झाले. अन् याच एका छोट्याशा  विचारातून, याच एका छोट्याशा संकल्पनेतून एक मूर्तिमंत असं स्वराज्य निर्माण झालं. हे स्वराज्य म्हणजे फक्त राजा आणि प्रजा, मालक आणि गुलाम असं नव्हते, तर प्रत्येक रयतेला, प्रत्येक मावळ्याला हे स्वराज्य म्हणजे आपलं घरंच आहे असं वाटायचं आणि असं वाटणं स्वाभाविकच होतं. कारण शिवाजी महाराज जरी राजे असले तरी ते रयतेवर कधीच हूकूम गाजवायचे नाहीत. रयतेचे कल्याण, रयतेची काळजी कोणत्या गोष्टींमध्ये आहे अशाच गोष्टींना ते प्राधान्य देत. राजांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती कि, 'शेतकऱ्यांच्या  मिरचीच्या देठालाही हात लावू नका, जो काही व्यवहार करावयाचा असेल तो रोखीने करा, सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. वृक्षतोड करू नका, जर लाकूडफाटा हवा असेल तर एखादं जीर्ण झालेलं झाड तोडा पण त्या ठिकाणी दुसरं झाड लावा'. या व अशासारख्या प्रजेच्या कल्याणाच्या कितीतरी आज्ञा शिवाजीराजांनी आपल्या सैन्याला दिल्या होत्या.

शिवाजी महाराजांची इतर धोरणे
         शिवाजी महाराज हे आपल्याला फक्त युद्ध, गड, किल्ले, लढाया एवढ्यासाठीच माहित आहेत. इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी शिवाजीराजांचं खरं काम आपल्याला कधीच नाही शिकवलं. छञपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, अर्थविषयक धोरण, आरमार, धार्मिक धोरण, राजकीय धोरण, समाजकारण, भाषाशास्ञ, यासारख्या कित्येक कलामध्ये निपून असणारे राजे आपणाला नाही शिकविले. शिवाजीराजांचा या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय दुरदृष्टीचा होता. राजे कोणताही निर्णय घेताना खूप पुढचा विचार करत असत. मगच निर्णय घेत. एखादी गोष्ट जर रयतेसाठी , समाजासाठी घातक असेल तर ती गोष्ट शिवाजीराजे कटाक्षाने टाळायचे आणि एखाद्या गोष्टीमध्ये रयतेचं कल्याण असेल तर ती गोष्ट कितीही महाग असेल, कितीही अडचणी असल्या तरी शिवाजीराजे ती गोष्ट केल्याशिवाय राहत नव्हते.

महाराजांनी सुरत जिंकली (लुटली नाही)
         काहीकाही समाजकंटक छञपती शिवाजी महाराजांना लुटारू, दरोडेखोर ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात कि छञपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. पण हे साफ खोटं आहे. शिवाजी राजांनी सुरत लुटली नाही तर जिंकली. कारण ती संपत्ती आपल्याच बहुजन समाजातील रयतेची होती. वेगवेगळ्या करांमधून गरीब रयतेकडून लुटलेली संपत्ती शिवाजी राजांनी सुरत जिंकून परत आणली व त्याचा उपयोग रयतेच्या कल्याणासाठी केला. विविध धरणे बांधली, पाण्यासाठी विहिरी बांधल्या. पण आपल्या राजांना बदनाम करण्यासाठी शिवाजी राजांना दरोडेखोर ठरवणारे समाजकंटकदेखील अजूनही या भूतलावर आहेत, याचीच खंत वाटते.

स्वराज्याचे आधारस्तंभ किल्ले
         शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी व त्यांचा विस्तार करण्यासाठी किल्ल्यांचे किती महत्व आहे, हे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या उभ्या हयातीत जवळपास तीनशेच्यावर किल्ले बांधले व त्यांची डागडुजी केली. परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव नाही दिले. खर्या अर्थाने शिवाजी महाराज हे स्थापत्यतज्ञ होते. त्यांनी बांधवून घेतलेली सर्वच्या सर्व किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत. (काहींचा अपवाद वगळता) 

दिवाळीत किल्ला का करतात...
यामागचं शास्त्र, (माहिती साभार: www.EkMaratha.com)
भारतात फार पूर्वीपासून दिवाळी साजरी केली जाते. पण दिवाळी या शब्दाला खरा अर्थ स्वराज्यात प्राप्त झाला.
सण साजरे करायचे तर परिस्थिती तशी लागते. जेव्हा आपला भारत, आपला गुलामगिरीत जगत होता , स्वराज्य  हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह.
हा उत्साह, हा  विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होतं. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होतं. लोक खरोखर सुराज्य, रयतेचं राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते.
त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला. स्वाभिमान जागृत झालेली मानसं आता गुलामीतून बाहेर येत होती.
हे सर्व पाहायला मिळत होते स्वराज्याच, घरचं रक्षण करणाऱ्या गड किल्ल्यांमुळे. उन, वारा, पाऊस यांचा सामना करत. अनेक संकटांना तोंड देत परंतु आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे न हटणारे हे किल्ले, हे गड. आपल्या सर्वांना प्रेमाने रक्षणारे हे किल्ले, स्वराज्याचे आधारस्तंभ. आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी पण किती प्रेम करावं या गडकोटांवर. स्वतःच्या लेकरांप्रमाणे मराठ्यांनी हे गड सांभाळले. मग एवढं प्रेम, एवढा आदर का असाच होता, त्याचे समाजात प्रतिबिंब दिसू नये का?
आणि म्हणूनच एक आदराचं आणि प्रेमाचं प्रतिक आणि घराचं रक्षण करणारा किल्ला हा प्रत्येकाच्या घराबाहेर दिसू लागला.
दिवाळी म्हणलं कि समृद्धीच प्रतिक आणि समृद्धीच कारण म्हणजे आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले हे किल्ले.
यापेक्षा दुसरं कारण माझ्यासाठी तर नाही.
आम्ही कोण म्हणुनी काय पुसता, 
आम्ही शिवबाचे मावळे,
गडकोट नाहीत नुसते,
आम्हांस भासती देवळे
जय जिजाऊ जय शिवराय...
चिमूटभर माती म्हणे, 
मी होईन पणती...
टीचभर कापूस म्हणे, 
मी होईन वाती...
थेंबभर तेल म्हणे, 
मी होईन साथी...
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...
दिपावलीच्या सर्वांना खूप खूप शिवशुभेच्छा...
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय भारत.

संतोष माने, आरग. Mo. +919595265612
Follow Me;

On YouTube
santosh mane, arag
sanam arag
https://m.youtube.com/channel/UCKjKWljm0HdnzCTSNtBVf-w

On Facebook
https://www.facebook.com/santhosh.mane7652

On Instagram
https://www.instagram.com/santhosh7652

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Santosh Mane SM News जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... आईच्या आईपणाला.. तिच्यातील बाईपणाला.. तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना.. त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना.. बायको नावाच्या अर्धांगिनीला.. तिच्यात दडलेल्या कारभारणीला.. संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला. दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला.. सख्या, चुलत, मावस बहिणीला.. बहिणी सारख्या प्रिय वहिनीला.. त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला.. माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला.. मावशी,आत्याला आणि मामीला.. त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला.. आज्जीच्या संस्कार सृष्टीला.. तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला.. घरच्या आणि शेजारच्या काकूला.. सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला.. मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या.. विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या.. भूत, वर्तमान, भविष्यकाळी रणरागिनींना.. तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा...

महावितरण शेतीच्या लाईटचे बदललेले वेळापत्रक

संतोष माने SM News: नमस्कार शेतकरी बांधवांनो. .. महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे; मार्च 2018 करिता; राञी 11:55 ते सकाळी 09:55 सकाळी 09:55 ते सायं. 05:55 एप्र...